Pune Weather: हवामानाचा ‘यू-टर्न’! दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री कडाक्याची थंडी; ‘या’ भागात पारा १० अंशावर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरासह उपनगरात कमाल व किमान तापमान कमी-अधिक होत असल्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिवसा ऊन रात्री थंडी असा लपंडाव अनुभवायला मिळत आहे. बुधवारी (दि. २१) हवेली परिसरात सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे थंडीचा पारा १४ ते १६ अंशाच्या पुढे पोहचला.
परिणामी थंडीचा जोर ओसरला असून, काही भागातून थंडी गायब झाली. गेल्या ४८ तासात किमान तापमानात पुन्हा घट झाली आणि पारा ९ अंशापर्यंत खाली उतरला. त्यामुळे हवेली, एनडीए, पाषाण यासह जिल्ह्यातील काही भागात थंडीचा कडाका पुन्हा वाढला. मात्र, आज दिवसभर कमाल तापमानात वाढ झाली. तसेच किमान तापमानातही एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर कमी-अधिक झाला.
पहाटे विरळ धुके, हलकीशी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री एनडीए, पाषाण, वारजे, नांदेड फाटा, कात्रज आदी परिसरात थंडी जाणवत होती. शहराच्या अन्य भागात थंडीचा जोर कमी होता. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील आकाश निरभ्र राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. दि. २३ जानेवारीपासून शहरातील आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
राज्यातील उत्तर भागात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होईल. त्यामुळे विदर्भासह अन्य काही जिल्ह्यात थंडीचा जोर वाढेल. पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
किमान तापमान
हवेली १०.९, एनडीए ११.२, माळीण ११.७, तळेगाव १२.५, बारामती १२.७, पाषाण १३, दौंड १३, शिवाजीनगर १३.३, आंबेगाव १३.६, गिरीवन १४.८, हडपसर १५.३, चिंचवड १६.८, कोरेगाव पार्क १७.२, वडगावशेरी १७.९, मगरपट्टा १८.१ अंश सेल्सिअस.





