Pune: पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी; अनेक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Pune Rain Update | पुण्यात रविवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. यातच आता आज पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
सिहंगड रस्ता, एकता नगर येथे पाण्याची पातळी वाढत
खडकवासला धरणातून आज सकाळी 11 वाजता मुठा नदीत सध्या 35000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकतानगर मधील द्वारका अपार्टमेंटचे पार्किंग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. एकतानगर मधील इतर सोसायटीच्या बाहेर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भारतीय लष्कर जवान, अग्निशमन दल पोलीस कर्मचारी तसेच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
सिहंगड रस्ता, एकता नगरी येथे पाण्याची पातळी वाढत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी सद्यस्थितीत जवळपास २५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. याबरोबरच एक श्वान एक मांजर यांची ही काळजी घेत आपले कर्तव्य बजावले. तर पिंपरी चिंचवड येथे NDRF तैनात करण्यात आले आहे. Pune Rain Update |
मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या या सूचना
दरम्यान, पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. Pune Rain Update |
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री पासूनच खडकसवाला धरण साखळी परिसरात जोरदार पाऊस असल्याने मोठया प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागणार होते. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि अग्निशमनदलाचे स्वतंत्र पथक या भागात तैनात करण्यात आले आहे. पथकाकडे बोटीसह, इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांंना बाहेर काढल्यास त्यांच्यासाठीची इतर सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा:





