Pune Water Cut – आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच घरगुती गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या पुणेकरांसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवल्याने, तसेच खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुणेकरांना आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे मान्सून कमी राहण्याबाबत चर्चा झाली होती. जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार, भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी महापालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की पाणी कपात न केल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईला सर्वस्वी संबंधित संस्था जबाबदार राहतील. दरम्यान, या पत्राची महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत येत्या शुक्रवारी (दि. १०) जलसंपदा विभाग आणि महापालिकेची संयुक्त बैठक बोलावली आहे. पुणे महापालिका भविष्यातील अनिश्चितता पुणे शहराला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून म्हणजेच खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून १३.२० टीएमसी म्हणजेच ४५.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १२.०४ टीएमसी साठा होता. यंदा १.१६ टीएमसी साठा जादा असला, तरी भविष्यातील अनिश्चिततेमुळे कपात अटळ मानली जात आहे. जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात येते. पुणे शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज लागते. १५ टक्के कपात लागू झाल्यास दिवसाला सुमारे २५० ते ३०० एमएलडी पाणी कमी मिळणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि त्यात १५ टक्के कपातीची टांगती तलवार असताना, महापालिका प्रशासन नेमकी अंमलबजावणी कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या काही भागांत आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, अधिकच्या कपातीमुळे पुणेकरांना मोठ्या पाणीटंचाई सामना करावा लागण्याची शक्यता आहे.