Pune District : पाईटमध्ये गॅस टंचाईचा भडका; नागरिक संतप्त, कठोर कारवाईची मागणी
Pune District : काही नागरिकांनी ‘ब्लॅक’ने पैसे घेऊनही दोन ते तीन महिने सिलेंडर न दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या गॅस कार्डची चौकशी केल्यास वर्षभरात किती सिलेंडर मिळाले हे स्पष्ट होईल, असे नागरिकांनी सांगितले.

आंबेठाण : खेड तालुक्यातील पाईट गावात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरगुती गॅस पुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित बुकिंग करूनही दोन ते तीन महिने गॅस सिलेंडर न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावातील श्रीराम गॅस एजन्सीकडून ग्राहकांकडून बुकिंग व पैसे स्वीकारले जात असतानाही प्रत्यक्षात वेळेवर गॅस पुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 500 ते 1000 रुपये अतिरिक्त रोख रक्कम घेऊन काळाबाजार होत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांनी केले आहेत.
यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. संतप्त नागरिकांनी एकत्र येत संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन जाब विचारला असता, समाधानकारक उत्तर न देता एजन्सी मालकाने तेथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एजन्सीचे मालक घोलप हे दुकानात सहसा उपस्थित राहत नाहीत तसेच फोनलाही प्रतिसाद देत नाहीत. काही नागरिकांनी ‘ब्लॅक’ने पैसे घेऊनही दोन ते तीन महिने सिलेंडर न दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या गॅस कार्डची चौकशी केल्यास वर्षभरात किती सिलेंडर मिळाले हे स्पष्ट होईल, असे नागरिकांनी सांगितले.
संबंधित एजन्सीचा परवाना तात्काळ रद्द करावा व गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी या प्रकरणावर तीव्र भूमिका घेत खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली.
त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित एजन्सीस दोन दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, संबंधित एजन्सीकडून वेळेवर पुरवठा शक्य नसल्यास प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून नागरिकांना नियमित गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक सहन केली जाणार नाही. गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
-जयसिंग दरेकर, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष





