Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! आता ‘या’ मोठ्या भागांतही दिवसाआड पाणी; महापौरांचा मोठा निर्णय
Pune Water Cut: भामा-आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिना संपूर्ण कोरडा; पाणी दीर्घकाळ टिकवण्यासाठी पालिकेचे नवीन नियोजन.

Pune Water Cut – भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या शहराच्या पूर्वोत्तर भागातही आता पुढील आठवड्यापासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. भामा-आसखेड धरणात केवळ २.१९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तसेच, धरणाने तळ गाठला आहे. तसेच, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे.
त्यामुळे हे पाणी आणखी काही महिने शिल्लक राहावे यासाठी पक्षनेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली. त्यासाठी प्रशासनाकडून लवकरच या भागासाठीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. या योजनेतून शहरातील येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, कळस, धानोरी, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, विमाननगर, खराडीचा काही भाग, वडगावशेरी, फुलेनगर, वाघोलीचा काही भागाला पाणी दिले जाते.
म्हणून या भागात उशिरा कपात?
मागील महिनाभरापासून भामा-आसखेड धरणातून गढूळ पाणी दिले जात असल्याने महापालिकेने या भागातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन या भागात पाणीकपात लावली नव्हती. मात्र, आता धरणातील पाणी वेगाने कमी होत असल्याने तसेच गाळाचे प्रमाण वाढत असल्याने दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी या योजने अंतर्गत नव्याने बांधलेल्या टाक्या लवकरच सुरू केल्या जाणार असल्याचे प्रशासनाने यावेळी बैठकीत सांगितले.





