Pune Water Cut – महापालिकेने थकबाकी न भरल्यास येत्या मंगळवारपासून पुणे शहराचे पाणी तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. याप्रकरणी आपण स्वत: ही बाब मुख्यमंत्र्यांना कळविली असून, त्यांनी लवकरच दोन्ही विभागांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. महापालिका आयुक्त म्हणून नाही, तर सर्वसामान्य नागरिक असतो, तरीही जलसंपदा विभागाची भूमिका आवडली नसती, अशा शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. खडकवासला धरण साखळीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाने महापालिकेला १४.६१ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेकडून प्रतिवर्षी सुमारे २१ टीएमसी पाणी उचलले जाते. त्यामुळे अतिरिक्त पाण्यावर १५ टक्के व्यावसायिक दर आकारण्यात येत आहे. वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया न केल्याने दंडही आकारला जात आहे. प्रत्यक्षात महापालिका जलसंपदा विभागास दरवर्षी सुमारे १७५ कोटींचे बिल नियमित देते. मात्र, त्यांच्याकडून आकारलेली थकबाकी चुकीची आहे. यापूर्वी शहरासाठी व्यावसायिक आणि घरगुती दराने शुल्क आकारले जात होते. मात्र, जलसंपत्ती नियामक आयोगाने त्यात १५ टक्के पाणी उद्योगांना वापरत असल्याचे शुल्क लावले आहे. महापालिकेने वेळोवेळी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील, असेही आयुक्त म्हणाले. अधिकाऱ्यांत वाद? जलसंपदा विभागाने महापालिकेस दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी खडकवासला जॅकवेलच्या ठिकाणी भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी तेथे जाणार असल्याने अधिकाऱ्यांमध्येच वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.