Pune Water Crisis : पुणेकरांची चंगळ, बळीराजाची होरपळ! तब्बल ६६ हजार हेक्टर शेती धोक्यात; ‘या’ ३ तालुक्यांचे होणार वाळवंट?
Pune Water Crisis : जलवाहिन्यांची गळती आणि बेकायदा नळजोड थांबवण्यात प्रशासन अपयशी; तब्बल ७ टीएमसी पाणी वाया गेल्याने शेतकरी आक्रमक.

Pune Water Crisis – यंदा ‘एल निनो’च्या संकटामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची स्पष्ट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुंबई महानगरपालिकेने आधीच १० टक्के पाणीकपात लागू करून दूरदृष्टी दाखवली आहे. मात्र, पुणे महानगरपालिका अद्यापही सुस्त असून, कोणतीही पाणीकपात न करता पुणेकरांना पाण्याचा अपव्यय करण्याची मुभा देत आहे.
महापालिकेच्या या आडमुठ्या आणि स्वार्थी भूमिकेमुळे हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील तब्बल ६६ हजार हेक्टर शेतजमीन पाण्यासाठी होरपळत असून, हजारो शेतकरी कुटुंबांचे जगणे धोक्यात आले आहे. पुणे महापालिकेने आता ‘थोरल्या भावाची’ भूमिका घेऊन ग्रामीण भागातील अन्नदात्याला जगवण्यासाठी थोडा त्याग करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. पुणे शहराला जागतिक निर्देशांकापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी प्रतिमाणशी दिले जाते.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषांनुसार प्रतिमाणशी १३५ ते १५० लीटर पाण्याची गरज असताना, पुणेकर जास्त पाणी ओरपतात, जे इतर शहरांच्या तुलनेत दुप्पट आहे, तरीही महापालिकेचे समाधान होत नाही. यातली सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, महापालिकेने स्वतः जलसंपदा विभागाला सादर केलेल्या अंदाजपत्रकात कबूल केल्याप्रमाणे शहरात पुरवल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३२ ते ३५ टक्के पाणी जुन्या, जीर्ण झालेल्या पाइपलाइन्स,
गळती आणि पाण्याच्या गैरव्यवस्थापनामुळे थेट वाया जाते. ३५ टक्के गळती म्हणजेच तब्बल ७ टीएमसीपेक्षा जास्त हक्काचे पाणी वितरणातील त्रुटी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गटारात वाहून जाते. शहरात असलेल्या एकूण नळजोडांपैकी हजारो नळजोड अनधिकृत आहेत, जिथून राजरोस पाणीचोरी होते. शहरातील जलवाहिन्यांची गळती आणि बेकायदा नळजोडांची चोरी थांबवली, तर पुणेकरांवर कपातीची वेळही येणार नाही आणि हक्काचे पाणी ग्रामीण भागाला मिळेल.
पण पालिका प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसते. पुणे महापालिका सध्या खडकवासला धरण प्रकल्पातून दररोज १३५ ते १४० कोटी लीटर (१३५० ते १४०० MLD) पाणी उचलत आहे. पालिकेचा मंजूर कोटा १४.६१ टीएमसी असताना प्रत्यक्षात पालिका २० ते २१ टीएमसी पाणी ओढत आहे. महापालिका आपल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलत असल्याने खडकवासला धरणातून सोडल्या जाणाऱ्या कालव्याच्या पाण्याचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
तीन तालुक्यांचे वाळवंट होईल
हवेली, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांमधील सिंचनाला याचा थेट फटका बसत आहे. खडकवासला मुठा उजव्या कालव्यावर अवलंबून असणारे ६६ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र केवळ पाण्याच्या योग्य आवर्तनाअभावी धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात पिके जळून खाक होत आहेत, तर टेल एंडला (कालव्याच्या शेवटच्या टोकाला) असणाऱ्या इंदापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण सुरू आहे. शहरात बागा फुलवायला पाणी उपलब्ध आहे, पण ग्रामीण भागात शेतीला पाणी नाही, हा कुठला न्याय ? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
चौकट






