Pune Crime News : पुण्यात मद्यधुंद कारचालकाचा थरार; ४-५ वाहनांना धडक; वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न
Pune Crime News : पुण्यातील वारजे भागात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या संजोग माने याने धुमाकूळ घातला.

Pune Crime News : वारजे परिसरात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकाने भरधाव वेगात ४ ते ५ वाहनांना धडक दिलीच, शिवाय कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. (Pune Crime News)
या प्रकरणी संजोग सुरेश माने (वय ३०) याला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगरकडे जात असताना शिवणे ते वारजे माळवाडी दरम्यान एक कार भरधाव वेगात जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कारने मार्गात काही वाहनांना धडक देत पुढे पळ काढल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. (Pune Crime News)
वारजे चौकाजवळ संबंधित कारने एका टेम्पोला धडक दिली. त्यानंतर क्षीरसागर यांनी धाडसाने कार ओव्हरटेक करून थांबवली. त्यांनी जवळील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून चालकाला पोलीस चौकीत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या.
View this post on Instagram
मात्र, वाहतूक पोलिस कर्मचारी कारमध्ये बसताच चालकाने अचानक वेग वाढवत कार पुढे दामटली. त्यामुळे काही काळ त्या कर्मचाऱ्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. हा प्रकार अपहरणाच्या प्रयत्नासारखा असल्याचे समजते.
यानंतर पुन्हा पाठलाग करत क्षीरसागर यांनी कार अडवून चालकाला पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर वारजे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Pune Crime News)





