Waiting for rain : पावसाची प्रतीक्षा, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम
Waiting for rain :

पुणे – शहरासह जिल्ह्यात आठवड्यापासून कमाल तापमान ३८ अंशावर स्थिर असल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले. गेल्या २४ तासात शहरातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाल्याने दुपारच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र उकाडा कायम आहे.
मंगळवारी शिवाजीनगर येथे सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने पुणे शहरासह जिल्ह्याकडे पाठ फिरल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्याने हैरान झालेले पुणेकर मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे.
आज दिवसभरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे दुपारी उन्हाचा तीव्र चटका कमी झाला असून, रात्री हवेतील गारव्यामुळे उकाडाही काहीसा कमी जाणवत आहे.
पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील तर कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.




