नगर | पावसाची प्रतीक्षा ; शेती मशागतीच्या कामांना आला वेग

नगर – गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामानाने पिकांची वाताहात झाली. त्यातच गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. पिकांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. आता पुन्हा बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला असून पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असल्याचे दिसत आहे.
दोन वर्ष पदरी निराशा पडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे, तरीदेखील खरीप हंगामातील पिकांसाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. चालू वर्षीतरी वरुणराजा कृपा करेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. मागील वर्षी मुगाच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला होता. यंदा मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला असल्याचे हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे.त्याच बरोबर कृषी विभागाच्या वतीने देखील खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली असून गावोगावी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत.
त्यामध्ये घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, शेततळे, गोगलगाय नियंत्रण, पाणीटंचाई पार्श्वभूमीवर फळबागा जतन करणे, प्रात्यक्षिक, कीड नियंत्रण प्रात्यक्षिक, शेतीशाळा नियोजन, पीक तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रशिक्षण, केंद्रनिहाय कर्मचारी नियुक्ती, आपत्कालीन पीक नियोजन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, फळबाग लागवड योजना, खते बियाणे औषधे यांचे परवाने निर्गमित करणे, फळबागा लागवडीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, मृद नमुने, खतांचा वापरं यासह अशाप्रकारे २८ उपक्रमांवर कृषी विभागाचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या खरीप पिकांबाबत आशा वाढलेल्या आहेत.
सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांनी भरपाई भरून निघेल या आशेवर शेतीची मशागत करून ठेवलेली आहे, मशागतीसाठी उसनवारी, कर्ज घेतले आहे.
– दत्तात्रय कदम, शेतकरी, मांजरसुंबा, ता. नगर.





