पिंपरी | पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

हिंजवडी, ( वार्ताहर) – मान्सूनचे आगमन झाले असले तरी पेरणीसाठी आवश्यक असणारा पाऊस अद्याप झालेला नसल्याने बळीराजा आतुरतने पावसाची वाट पाहत आहे. पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. भात रोपांची चांगली वाढ झाली असून पेरणासाठी शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.
भात पिकाचे आगार असलेल्या मुळशी तालुक्यातील रिहे खोऱ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीस टाकलेली भात रोपे चांगलीच सरळली असून समाधानकारक पाऊस झाला तर येत्या चार पाच दिवसांत भातलागवड सुरू होईल.
त्यामुळे मुळशी तालुक्यातील बळीराजा आता जोरदार पावसाच्या प्र.ितक्षेत आहे. असे पिंपळोली येथील कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी नवनाथ शेळके यांनी सांगितले .
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या भात खाचरात भात रोपे तयार करताना त्यांनी आधुनिक पध्दती अवलंबली आहे. सुरवातीला गादी वाफे तयार केले. त्याला समतल पाट तयार केले. भाताच्या बियानांची बीज प्रकि्रया करून घेतली.
गादी वाफ्यावर हाताने बी फोकून टाकले. परीणामतः बी वर राहून चार दिवस अगोदर दाण्यामधून रोप बाहेर येण्याला सुरवात होते. ही रोपे आता चांगलीच सरळली असून येत्या चार दिवसांत पाऊस झाल्यास भात लागवड सुरू करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गादी वाफ्यात तयार केलेली रोप काढताना एकदम सोप्प होतं. अगदी अलगदपणे भात रोपे काढता येतात. एक औषध फवारणी केल्यास तणांचा नाश होतो. कमी खर्चात कमी पैशात अशा प्रकारे भाताची रोपे तयार करता येतात.
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा पध्दतीचा अवलंब करावा. असे आवाहन पिंपळोलीचे माजी सरपंच प्रगतीशील शेतकरी बाबाजी शेळके यांनी केले आहे.
पेरणी झाली की पंढरीची वाट
मुळशी तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आषाढी वारीसाठी पंढरीला जातात. पेरणी करुन बळीराजा विठुरायाच्या दर्शनाला जात असतो. यामुळे लवकर पाऊस यावा, पेरणी व्हावी आणि पालखीसोबत पंढरीला जाता यावे, यासाठी शेतकरी विठ्ठलाला साकडे घालत आहेत.
” दरवर्षी आम्ही मे महिन्याच्या अखेरीस भात रोपे टाकतो . त्यास पाटात पाणी सोडून त्याच्या निचऱ्याने रोपांची उगवण होते. यंदाही भात रोपे जोमात आली आहेत परंतु यंदा पाऊस नसल्याने लागवडी खोळंबल्या आहेत.
अन्यथा आता आमची भात लागवड सुरू झाली असती. भातलागवड पूर्ण करूनच दरवर्षी आम्ही पंढरपूरला पायीवारीत दिंड्यामध्ये सहभागी होत असतो “बाबाजी शेळके ( अध्यक्ष – मुळशी तालुका वारकरी सेवा संघ )





