पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर, खडकवासला विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या २९ यंत्रांमधील मतांची पडताळणी करण्यात येणार आहे. ही पडताळणी २५ जुलै ते २ ऑगस्ट या काळात होणार असून यावेळी केवळ कंट्रोल युनिटमधील मतांची अंतिम आकडेवारी संबंधित उमेदवाराला दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर नव्याने १ हजार ४०० मते टाकून व्हीव्हीपॅट यंत्रातील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली. हडपसर मतदारसंघाच्या मतमोजणीत अनियमितता झाल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रशांत जगताप, खडकवासलातील याच गटाच्या सचिन दोडके यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. उमेदवारांच्या याचिकांनंतर मतदारसंघातील मतमोजणी यंत्रांमधील मतांचा डेटा अद्याप कायम ठेवला आहे. न्यायालयाच्या तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर मतांच्या पडताळणीसाठी वेळापत्रक ठरविले आहे. हडपसरसाठी २७ तर खडकवासलासाठी २ यंत्रांची पडताळणी होणार आहे. आदेशानुसार २५ जुलैला हडपसर व खडकवासल्यातील प्रत्येकी दोन यंत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर १ ऑगस्टपर्यंत हडपसरच्या प्रत्येकी ४ आणि २ ऑगस्ट रोजी एका यंत्राची पडताळणी केली जाईल. यात उमेदवाराने निवडलेल्या प्रत्येक कंट्रोल युनिटमधील प्रत्यक्ष मतमोजणीवेळी प्रत्येक उमेदवाराला पडलेली मते दाखविली जातील. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील माहिती खोडून मतदान यंत्रांवर १ हजार ४०० मते टाकून त्याच्या व्हीव्हीपॅट यंत्रांमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. ही मते टाकताना उमेदवाराला मान्य असल्यास पूर्वीच्या मतपत्रिकेवरच टाकण्यात येतील किंवा नवी मतपत्रिका करण्यात येईल. यासाठी चार हॉल ठेवण्यात येणार असून आक्षेप घेतलेला उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहू शकणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी कळसकर यांनी दिली. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल अनेक मतदारसंघातून आक्षेप नोंदवले होते. हडपसरच्या मतमोजणीच्या प्रक्रियेवरही आक्षेप नोंदवत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. ही मागणी मान्य केल्याबद्दल जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले असून हडपसरमधील मतांची चोरी जगासमोर येणार असल्याचा दावा जगताप यांनी केला आहे