प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थी वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही घरच्या सणाचा आनंद अनुभवता आला. विद्यापीठाच्या एकूण १० वसतिगृहांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.ज्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात आपल्या घरी जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये या फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आले.कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सणाचा आनंद द्विगुणीत केला. याप्रसंगी अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, कृष्णा भंडलकर, वसतिगृह प्रमुख डॉ. सोनिया नगराळे, डॉ. परवीन तलत, विद्यार्थी विकास मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. सविता कुलकर्णी आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी संचालक डॉ. गणेश भामे आदी मान्यवर उपस्थित होते.