पुणे : एकेकाळी ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून गौरवले गेलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यंदाच्या ‘राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) क्रमवारीत मोठ्या प्रमाणात घसरले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या 2025 च्या क्रमवारीत, गेल्या वर्षी (2024) देशातील सर्वोत्कृष्ट 100 संस्थांमध्ये 37व्या स्थानावर असलेले पुणे विद्यापीठ यंदा 91व्या क्रमांकापर्यंत खाली आले आहे. तसेच, देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये ते 56व्या स्थानावर आहे. सलग सहाव्या वर्षी विद्यापीठाच्या क्रमवारीत घसरण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. खासगी विद्यापीठांचा दबदबा पुण्यातील खासगी आणि अभिमत विद्यापीठांनी यंदा पुणे विद्यापीठाला मागे टाकले आहे. ‘एनआयआरएफ’ क्रमवारीत सिंबायोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाने 40वे, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसर) 55वे, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने 71वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी पुणे विद्यापीठ सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये 23व्या आणि सर्वोत्कृष्ट 50 सार्वजनिक राज्य विद्यापीठांमध्ये तिसऱ्या स्थानावर होते. यंदा मात्र सार्वजनिक राज्य विद्यापीठांच्या क्रमवारीतही ते 11व्या स्थानावर घसरले आहे. एनआयआरएफ’ क्रमवारी आणि निकष केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘एनआयआरएफ’ क्रमवारीत शिक्षण संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, विधी, कृषी, इनोव्हेशन, मुक्त विद्यापीठे, कौशल्य विद्यापीठे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अशा 17 गटांमध्ये क्रमवारी जाहीर होते. यामध्ये संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधारकांचे निकाल आणि शिक्षणाची गुणवत्ता यासारखे निकष विचारात घेतले जातात. क्रमवारी घसरणीची कारणे विद्यापीठ प्रशासनाने क्रमवारीतील घसरणीचे मुख्य कारण प्राध्यापकांच्या संख्येतील कमतरता असल्याचे नमूद केले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ज्येष्ठ प्राध्यापक निवृत्त झाले, ज्यामुळे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तरावर (एफएसआर) परिणाम झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली, परंतु प्राध्यापकांची संख्या अपुरी राहिल्याने गुणोत्तर बिघडले. तसेच, निवृत्त प्राध्यापक हे उत्कृष्ट संशोधक असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत संशोधन प्रकाशनांमध्येही घट झाली. विद्यापीठाकडून आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले, “रँकिंगमधील घसरणीकडे आमचे लक्ष आहे. विद्यापीठाची कामगिरी सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. सध्या प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर आणि संशोधन क्षेत्रात लक्षणीय सुधारणा होईल.” वर्ष देशातील एकूण कामगिरीत क्रमवारी (ओव्हरऑल) देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांमधील क्रमवारी २०२५ ९१ ५६ २०२४ ३७ २३ २०२३ ३५ १९ २०२२ २५ १२ २०२१ २० ११ २०२० १९ ०९ २०१९ १७ १० या घसरणीमुळे पुणे विद्यापीठाच्या प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले असून, येत्या काळात सुधारणांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.