प्रभात प्रभाव । विद्यार्थिंनींना विनाशुल्क प्रवेश ; पुणे विद्यापीठाचे परिपत्रक, १०० टक्के शुल्कमाफी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयात विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिंनींना १०० टक्के शुल्कमाफी करण्याच्या आदेशाचे परिपत्रक पुणे विद्यापीठाने काढले आहे. यामुळे महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना मुलींना विनाशुल्क प्रवेश देणे अनिवार्य राहणार आहे.
राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तंत्रशिक्षण विभागाकडून परिपत्रक अद्याप प्राप्त झाले नाही. त्यावरुन काही शिक्षण संस्थांकडून मुलींना मोफत प्रवेश देण्यावरुन दिरंगाई करत होते. आता मात्र पुणे विद्यापीठाने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केल्याने शिक्षण संस्थांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिंनींच्या पालकांचे एकूण उत्पन्न आठ लाखांच्या आत हवे. तसेच प्रवेश हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे झालेला असावा, अशा अटी आहेत. त्यातच बीए, बीकॉम, बीएस्सी अशा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांना शुल्क सवलतीची योजना ही २०१७ पासून लागू आहे.
मात्र, असे असतांनाही विद्यार्थिंनींना शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असून, विद्यार्थिंनींना पैसे नसल्याने प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यावर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत.
विद्यापीठाच्या सुचनेनुसार सक्षम प्राधिकरणाकडून राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शुल्कात ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करण्यात यावे, अशा सूचना शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. याबाबतच परिपत्रक विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी प्रसिद्ध केले आहे.
आज मंत्रालयात बैठक, कार्यपद्धती ठरणार
व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत देण्याच्या निर्णयावरुन काही महाविद्यालये व शिक्षण संस्था संभ्रमात आहेत. तसेच पालकांमध्येही या निर्णयाबाबत स्पष्टता नाही. या सर्व पार्श्वभूमीवर हा संभ्रम दूरण्यासाठी उद्या (दि.१९) मंत्रालयात प्रधान सचिवांनी बैठक बोलावली आहे.
यात सर्व उच्च शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोफत शिक्षणाची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशीही एक शक्यता
मुलींना ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के शुल्कमाफीचा निर्णय झाला. यापूर्वी ५० टक्के शुल्क माफ असताना जी कार्यपद्धती होती, त्याचप्रमाणे अंमलबजावणी होणार आहे. पूर्वी विद्यार्थिनी प्रवेश घेत असताना केवळ ५० शुल्क भरायचे आणि उर्वरित ५० टक्के शुल्क राज्य शासनाकडून थेट महाविद्यालयाच्या बॅंक खात्यावर जमा करायचे. त्या पद्धतीने आता विद्यार्थिंनीकडून कोणतेही शिक्षण शुल्क न घेता प्रवेश द्यावे लागणार आहे, हे स्पष्ट होत आहे.
आदेश निघाला, पण मार्गदर्शक तत्वेच नाहीत
दरम्यान, दैनिक प्रभातने दि.१७ जुलै रोजी या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्क संपूर्णत: माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या संदर्भात राज्य सरकाकडून मार्गदर्शक तत्वे अथवा लेखी परिपत्रक अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे प्रवेश शुल्काबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमावस्था आहे. असे त्यात म्हटले होते. दम्यान, प्रभातची दखल घेत विद्यापीठाने१०० टक्के शुल्कमाफीचे परिपत्रक जारी केले असून. विद्यार्थिंनींना विनाशुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.





