पुणे जिल्हा | टी.सी. महाविद्यालयात जल्लोषात आला जल्लोष

बारामती, (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जल्लोष -२०२४ जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय,
बारामती यांनी २७ पैकी सगळ्यात जास्त १८ कला प्रकारात जिंकून पारितोषिकांची लूट केली आणि यावर्षीच्या जल्लोष – २०२४ चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीणमधील २३ महाविद्यालयातील ५८८ स्पर्धक युवक सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वररंग या नावाचे जल्लोष – २०२४ या नावाने नामकरण केले होते आणि पहिल्याच वर्षीचा जल्लोष- २०२४ हे विजेचेपद तु.च. महाविद्यालयाने पटकावले.
पारितोषिक वितरण समारंभाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, पुणे विद्यापीठाचे स्पर्धा समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या आवारात विजयी विद्यार्थ्यांचे व जल्लोष करंडकाचे हलगीच्या तालावर व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
जल्लोष – २०२४ हे विजेतेपद पटकविण्यासाठी प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भीमराव तोरणे, प्रा. राजेंद्र कंडरे, सोमनाथ कदम, प्रा.जय दोशी, प्रा. विशाल मोरे, सौरभ पांढरे, सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी प्रयाग खुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाच्या शिरपेचा जल्लोषाने मानाचा तुरा रोविल्याबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
विजयी मिळवलेले कलाप्रकार
प्रहसन, एकांकिका, भारतीय समूह नृत्य, भारतीय समुह गायन, मूकनाट्य, पश्चिमात्य समूह गायन, लोक वाद्यवृंद समूह, प्रश्नमंजुषा, इन्स्टॉलेशन, वादविवाद, चिकटकला,
मेहंदी, पोस्टर मेकिंग, पाश्चिमात्य वाद्य वादन, स्वर वाद्य, सुगम संगीत, फोटोग्राफी, शास्त्रीय नृत्य या कला प्रकारांमध्ये सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.





