Pune : वारजे भागात सिलिंडरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

पुणे : सिलिंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागातील गोकुळनगर परिसरात मध्यरात्री घडली.
मोहन माणिक चव्हाण (वय ४३), आतिश मोहन चव्हाण (वय २३ दोघे सध्या रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गोकुळनगर भागात एका पत्र्याच्या खोलीत मोहन आणि आशिष राहायला होते. मध्यरात्री सिलिंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची माहिती वारजे अग्निशमन केंद्राला मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर, तांडेल मरळ, जवान भिलारे, माने, साळुंखे, ओव्हाळ यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. दोघांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सिलिंडरमधून गॅस गळती नेमकी कशी झाली, याबाबतची माहिती मिळाली नाही





