Pune : एकाच वेळी दोन पदवीवर शिक्कामोर्तब

पुणे : देशात आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन शैक्षणिक पदव्या घेण्यास परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अखेर घेतला आहे. या निर्णयाचे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. अखेर यूजीसीने हा निर्णय घेतल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.
एकाच वेळी दोन पदवी घेण्यात येणारी बंदी उठविली असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षमतांचा विकास करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
एकाच वेळी दोन पदव्यांसाठी प्रवेश घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून, यूजीसीने नुकत्याच झालेल्या बैठकीत एक महत्त्वाचा बदल केला. हा बदल ५ जून रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता नवीन नियमांनुसार जर एखाद्या विद्यार्थ्याने यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकाशनापूर्वी निश्चित केलेल्या मानकांचे पालन करून एकाच वेळी दोन शैक्षणिक अभ्यासक्रम केले असतील, तर ते वैध मानले जाणार आहेत.
हे अभ्यासक्रम यूजीसी, संबंधित विद्यापीठ किंवा त्याच्या कायद्याच्या पहिल्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी नियमांनुसार असणे आवश्यक आहे. जर ते व्यावसायिक अभ्यासक्रम असतील, तर त्यांना यूजीसीच्या दूरस्थ शिक्षण परिषद किंवा दूरस्थ शिक्षण संबंधित मान्यताप्राप्त संस्थेने मान्यता दिली पाहिजे, असेही यूजीसीने म्हटले आहे.




