Pune Traffic Update : पुणेकरहो उद्या घराबाहेर पडताय? ‘या’ मुख्य रस्त्यांवर नो-एन्ट्री; शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल
Pune Traffic Update : सकाळी ७ पासून मध्य भागातील महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; गर्दी ओसरेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.

Pune Traffic Update – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत उद्या, गुरुवारी (१९ फेब्रुवारी) वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. शिवाजी, बाजीराव, लक्ष्मी, नेहरु रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. गर्दी कमी होईपर्यंत हा बदल कायम असेल.
शिवजयंतीनिमित्त मध्य भागातून मिरवणूक काढण्यात येते. शिवाजी, बाजीराव, लक्ष्मी, नेहरु रस्ता, तसेच कुमठेकर, केळकर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. बुधवार पेठेतील हुतात्मा चौकातून स्वराज्य रथ मार्गस्थ होतात. शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल येथे मिरवणुकीचा समारोप होतो.
स्वराज्य रथांच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक, झाशीची राणी चौक, खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
गणेश रस्ता, जिजामाता चौक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. वाहन चालकांनी दारुवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक वळविली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पूरम चौकातून बाजीराव रस्तामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांनी टिळक रस्ता, डेक्कन जिमखाना शिवाजीनगरकडे जावे. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन शिवाजीनगरकडे जावे. मध्य भागात शिवाजीनगरकडून येणाऱ्या वाहनचालकांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन नारायण पेठेकडे यावे.
केळकर रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी नारायण पेठमार्गे इच्छितस्थळी जावे. मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सातपासून बदल होतील. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतुकीस रस्ते खुले होतील.





