Pune Traffic Jam: शनिवार ठरला ‘कोंडीचा वार’! २९ ठिकाणी झाडपड, ट्रॅफिक जॅमने पुणेकर वेठीस
Pune Traffic Jam: सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल; सिंहगड रस्ता, मुंबई–बंगळुरू महामार्ग आणि कोथरूड परिसरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे ठप्प.

Pune Traffic Jam : गेले चार दिवस सुरू असलेला संततधार पाऊस, ठिकठिकाणी साचलेले पाणी, रस्त्यांची दुरवस्था, २९ ठिकाणी झालेली झाडपड, नांदेड सिटी परिसरात चिखलात रुतलेला मालवाहू ट्रक आणि आळंदी–पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतूक निर्बंध अशा विविध कारणांमुळे पुणेकरांच्या दृष्टीने शनिवार कोंडीचा वार ठरला. शहरातील प्रमुख मार्गांवर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने हजारो वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागले.
सिंहगड रस्ता, मुंबई–बंगळुरू महामार्ग, सेवा रस्ता, कोथरूड, मुंढवा, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रस्ता, वारजे, हडपसर आणि शहरातील अनेक अंतर्गत मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती. कार्यालयीन वेळेत नागरिकांना नेहमीपेक्षा दुप्पट वेळ प्रवासात घालवावा लागला. वाहतूक कोंडीची तीव्रता वाढविणारी प्रमुख घटना नांदेड सिटी परिसरात घडली. बांधकामस्थळी माल उतरविण्यासाठी आलेला मालवाहू ट्रक चिखलात रुतल्याने सिंहगड रस्ता आणि मुंबई–बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू असताना सेवा रस्ता, महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. याचवेळी आळंदी–पंढरपूर पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर–दिवे घाट मार्गावरील धोकादायक कातळ हटविण्याचे काम हाती घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने पर्यायी मार्गांवर अतिरिक्त वाहतुकीचा ताण आला. पावसामुळे मुंढवा पूल, अमनोरा मॉलकडे जाणारा मार्ग, मुंढवा चौक, लॉ कॉलेज रोड,

सेनापती बापट रस्त्यावर एका चारचाकी वाहनावर भले मोठे झाड उनमळुन पडल्यामुळे त्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.
कोथरूड डेपो चौक तसेच शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. लॉ कॉलेज रोडवर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथे वाहतूक पोलीस नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. कोथरूड डेपो चौकासह अनेक भागांतील खोल खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग आणखी मंदावला.रस्त्यांची दूरवस्था आणि पाण्याखालील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरले.
२९ ठिकाणी झाडपडी
संततधार पावसामुळे शनिवारी दुपारपर्यंत झाडे व मोठ्या फांद्या कोसळण्याच्या २९ घटना घडल्या. येरवडा, हडपसर, गणेशखिंड रस्ता, लोहगाव, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, करिष्मा सोसायटी, सेनापती बापट रस्ता, मार्केट यार्ड, नारायण पेठ, वारजे, विश्रांतवाडी, कोंढवा, पाषाण-बाणेर रस्ता, शिवाजीनगर, गणेश पेठ, कोरेगाव पार्क आदी भागांत या घटना घडल्या.जुन्या मुंबई–पुणे रस्त्यावरील वाकडेवाडीतील स्फूर्ती सोसायटीकडे जाणारा रस्ता झाड पडल्याने काही काळ बंद झाला. अग्निशमन दलाने यंत्रसामग्रीचा वापर करत झाड हटवून रस्ता खुला केला.अग्निशमन दलाचे जवान दिवसभर झाडे हटविण्यात व्यस्त होते.





