pune : लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडी सुटेना
Pune:

पौड फाटा ते बालभारती पर्यायी मार्गाचे काम कधी सुरू होणार?
pune : शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा असलेल्या लॉ कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडी आता वाहनचालकांसाठी नित्याची डोकेदुखी बनली आहे. सकाळी आणि संध्याकाळीच नव्हे, तर दिवसातील कोणत्याही वेळी या रस्त्यावरून प्रवास करायचा म्हटल्यास वाहनचालकांच्या अंगावर काटा येतो, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून सुचविण्यात आलेल्या पौड फाटा ते बालभारती या पर्यायी मार्गाच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांसह वाहनचालक विचारत आहेत.
लॉ कॉलेज रोड हा कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता या भागांना शिवाजीनगर आणि डेक्कनशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. सध्या या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या अमार्याद झाली आहे. परिणामी एसएनडीटी कॅनाॅल रस्ता ते बालभारती हे दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन मिनिटांएवजी दहा ते पंधरा मिनिट वेळ लागतो.
त्यात सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये हा वेळ आणखी वाढतो. त्यामुळे लॉ कॉलेज रोडवरील ही कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेने टेकडीच्या बाजूने पौड फाटा ते बालभारती असा नवीन डीपी रस्ता प्रस्तावित केला होता. विविध हरकती, आक्षेपांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता.
अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर या नवीन मार्गाला संमती देण्यात आली. या निर्णयामुळे येथील रहिवाशांना आणि अभ्यागतांना कोंडीतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली होती; परंतु केवळ कागदावरच मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या रस्त्याच्या कामाला कायदेशीर संमती मिळाली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता केवळ पर्यावरण मंजुरीची औपचारिकता बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने यापूर्वीच प्रकल्पाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हे काम लवकरच सुरू होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते, पुणे मनपा
बालभारती रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे ऐकून आनंद झाला होता; पण कामच सुरू झाले नसल्यामुळे ऑफिसला जाताना लॉ कॉलेज रोडवर किमान १५ ते २० मिनिटे अडकून राहावे लागते. या वाहनांच्या धुरामुळे ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
– स्थानिक रहिवाशी





