pune : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूक बदल

पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर-सासवड रस्ता वाहतुकीस बंद
पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उद्या, शनिवारी (११ जुलै) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. यामुळे शनिवारी मध्यरात्री दोननंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल केले आहे.
पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद असेल. पहाटेपासून वाहतूक बदल होईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून तर श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवेल. दोन्ही पालख्या लष्कर भागातून हडपसर गाडीतळापर्यंत एकत्रित जातील.
तेथून दिवे घाटमार्गे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड येथे रविवारी मुक्कामी पोहोचेल. श्री तुकाराम महाराज पालखी यांची हडपसर गाडीतळमार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर येथे मुक्कामी येईल. मध्यरात्री दोननंतर टप्याटप्याने पालखी मार्ग वाहतुकीस बंद असेल. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल.
प्रस्थान मार्गावर सर्व वाहने लावण्यास मनाई असून पालखी प्रस्थानानंतर टप्याटप्याने वाहतूक पूर्ववत होईल. सासवडला जाणाऱ्या दिंडीतील वाहनांनी भैरोबा नाला, लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाटाचा वापार करावा. वाहतूक नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक – ०२०-२६६८५००० किंवा २६६८४०००
वाहतुकीस बंद रस्ते
संत कबीर चौक ते बेलबाग चौक, संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल ते मम्मादेवी चाैक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक हाॅटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, मोरओढा ते भैरोबा नाला चौक, भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, सोलापूर रस्त्यावरील बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, रामटेकडी, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन), सीरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडीमशीन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत )





