pune :घाटमाथ्यावर पावसाचा हाहाकार
Pune:
लोणावळ्यात ६२० मिमी, तर ताम्हिणीत ५३० मिमी पावसाची नोंद
pune : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सह्याद्री घाट हिरवाईने नटला असून, फेसाळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, घाटमाथ्यावरील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या २४ तासांत खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील दावडी घाटमाथ्यावर आतापर्यंतचा सर्वोच्च म्हणजेच तब्बल ६८८ मिमी इतका ऐतिहासिक पाऊस नोंदवला आहे. सह्याद्री पश्चिम घाटाच्या भागात नोंदवलेला हा आजवरचा सर्वाधिक पाऊस आहे.
गेल्या ४८ तासांत लोणावळा, ताम्हिणी, मुळशी, खेड, जुन्नर, भोर आणि राजगड या भागात पावसाने प्रचंड धुमाकूळ घालत आतापर्यंतचे सर्व नवनवीन उच्चांक मोडीत काढले आहेत. दावडी घाटमाथ्याप्रमाणेच लोणावळा परिसरातही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने उच्चांक गाठला आहे.
लोणावळ्यात आजही पुन्हा ६२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे डोंगररांगांमधून वाहणारे पाण्याचे लोंढे रस्ते आणि पुलांचे कठडे तोडून वाहत आहेत. ओढे आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, सखल भागातील गावांमध्ये पाणी घुसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
घाटमाथा क्षेत्रातील इतर ठिकाणच्या पावसाची आकडेवारी पाहता ताम्हिणी येथे ५३० मिमी आणि भिरा येथे ५१२ मिमी, तर डुंगरवाडी येथे ४२३ मिमी आणि शिरगाव घाट परिसरात ४२० मिमी पावसाची नोंद झाली. वळवण येथे ३९२ मिमी पाऊस नोंदवला गेला. या रेकॉर्डब्रेक पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.





