Pune : एकत्रच ; मात्र, अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढू

पुणे : आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रिपणे लढविणार असले तरी अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळे लढणार असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याने स्थानिक स्वराज निवडणुकीत तुल्यबळ ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्यशाळा यशदा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकांबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. परंतु, अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल.
शेवटी, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जेथे तुल्यबळ स्पर्धक असतील तिथे अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता आम्ही चांगली स्पर्धा करू, कार्यकर्ते अनेक वर्ष प्रभागात काम करतात, त्यांना संधी द्यायला हवी. निवडणूकपूर्व वेगळी लढत झाली तरी निवडणुकीनंतर निश्चितच युती होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 2022 पूर्वीच्या स्थितीनुसार महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काम करीत आहे. महायुती म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती मोठ्या ताकदीने लढेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वेळेत निवडणुक होतील…
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या मुदतीबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पावसाचा जोर असेल त्या भागात निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करू. याबाबत सरकार आणि निवडणूक आयोग योग्य तो समन्वय राखेल. पण, वेळेत निवडणुका पूर्ण झाल्याच पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे.





