पुणे ते संभाजीनगर प्रवास अवघ्या २ तासात; नितीन गडकरींची मोठी घोषणा! ‘असा’ असणार नवा महामार्ग

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरू असून, आजचा अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अशातच भाजप नेते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे या दोन शहरांमध्ये प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या दोन तासांत पुणे ते संभाजीनगर हे अंतर पार करता येणार आहे. याविषयीची माहिती नितीन गडकरी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली.
पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्गासाठी १६ हजार ३१८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला पुण्याहून संभाजीनगर प्रवास करण्यासाठी सहा ते साडेसहा तास वेळ लागत आहे. आता हा वेळ कमी होऊन दोन तासांवर येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या प्रकल्पाशिवाय नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील आगामी प्रकल्पांचीही माहिती दिली.
“आम्ही पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. यासाठी १६ हजार ३१८ कोटींचा खर्च येणार आहे. याचा एमएयू झाला असून पहिला रस्ता पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा असणार आहे. तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार आहे. यावर काही ठिकाणी पूल बांधले जाणार आहेत. यासाठी दोन हजार कोटी खर्च केले जाणार आहेत.”
याशिवाय दुसरा रस्ता शिक्रापुर येथून जाणार असून, हा रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यात जाईल आणि तिथून तो संभाजीनगरपर्यंत जोडण्यात येणार आहे, हा ग्रीन फिल्ड हायवे असणार असल्याचे गडकरींनी सांगितले. महत्वाचे म्हणजे पुणे ते नागपूर असा एक्सप्रेस महामार्ग होणार असून, यामुळे संभाजीनगर नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. हा प्रवास अडीच तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. नितीन गडकरी यांनी घोषणा केलेले प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास आल्यानंतर याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.
या शिवाय हडपसर ते यवत महामार्गाचा सामंजस्य करार झाला असून, एनएचएआयकडून पुणे (खेड) ते नाशिक फाटा असा महामार्ग होणार आहे. 93 टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. नाशिक ते आळंदी आणि आळंदी ते खेड असे दोन टप्प्यांत काम होणार आहे, अशीही माहिती गडकरी यांनी दिली.





