Mumbai-Goa National Highway: महाराष्ट्रातील ‘हे’ तीन महत्वाचे रस्ते कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींनी लोकसभेत थेट तारखाच सांगितल्या…

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यात प्रामुख्याने गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा शब्द त्यांनी दिला.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, “हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. अनेक कंत्राटदार बदलले, जमीन अधिग्रहणाच्या समस्या होत्या. पण, आतापर्यंत ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे आणि एप्रिल २०२६ च्या आत हे काम पूर्ण केले जाईल.”
पुणे-कोल्हापूर आणि धुळे-पिंपळगाव मार्गाचेही काम मार्गी –
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे-कोल्हापूर (पुणे-सातारा-कोल्हापूर) मार्गाच्या प्रलंबित कामाबद्दल विचारणा केली. त्यावर गडकरींनी लवकरच काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
“पुणे ते सातारा या रस्त्याचे काम रिलायन्सकडून काढून घेतले असून विभाग त्याचा आढावा घेत आहे. खंबाटकी घाटातील एका बोगद्याचे काम लवकरच सुरू होईल. पुढील आठवड्यात माझी बैठक आहे आणि वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केले जाईल,” असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव यांनी उपस्थित केलेल्या धुळे-पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलताना गडकरींनी सांगितले की, तिसरे नूतनीकरण जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्याची अंतिम मुदत एप्रिल २०२६ आहे. तसेच, सद्यस्थितीतील चौपदरी रस्ता सहा पदरी करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या मार्गांच्या कामांची मुदत केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.





