प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर ( शेरखान शेख ) – शिरूर तालुक्यात जमिनीचे वाढते भाव आणि कंपनीतील ठेकेदारी यातून स्पर्धात्मक दृष्टिकोन वाढून गुन्हेगारी वाढत असताना, दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी ‘धिंड’ काढण्याचा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून होत असलेली ही कारवाई गुन्हेगारी मोडून काढेल, अशी आशा निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यात औद्योगिक वसाहत वाढल्यामुळे जमिनींचे भाव, कंपन्यांचे ठेके मिळवण्याची स्पर्धा आणि त्यातून होणारा संघर्ष यामुळे गोळीबार व कोयता गँगसारखे संघटन वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी युवक भाईगिरी करत असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या युवकांमध्ये संघर्ष वाढल्याने पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सराईत गुन्हेगार विकी खराडे याची गावातून धिंड काढली होती.सध्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी नुकतेच कोरेगाव भीमाचा माजी उपसरपंच गणेश फडतरे आणि शिक्रापूर येथील मोन्या उर्फ सुरज देंडगे यांची त्यांच्याच वस्तीतून हातात बेड्या घालून पायी धिंड काढून गुन्हेगारांना एक शांततेचा संदेश दिला आहे. तसेच, एक महिन्यापूर्वी वारंवार गुन्हे करणाऱ्या गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर, निखील विजय पलांडे, बाबूलाल अरूण भुजबळ, प्रसाद प्रल्हाद ढगे आणि सागर सुनील वर्पे यांना दोन वर्षांसाठी पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींसाठी पोलिसांनी हद्दपार, मोक्का आणि धिंड सारखे हत्यार उगारल्यामुळे सराईतांनी चांगलाच धसका घेतला आहे. पुढील काळात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची दहशत वेळीच मोडीत काढून सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. पोलीस निरीक्षकांचे स्पष्टीकरण शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आम्ही सराईत गुन्हेगारांवर योग्य कायदेशीर कारवाई केलेली आहे. यापुढे कोणी दहशत निर्माण करणे, किंवा वेगवेगळे गुन्हे करत असेल तर त्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले. नागरिकांचे मत शिक्रापूर पोलिसांनी दोन महिन्यात दहशत निर्माण करणाऱ्या दोन वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांची त्यांच्याच गावातून धिंड काढून त्यांची गुन्हेगारी मोडून काढली. तसेच, एक महिन्यापूर्वी पाच जणांना हद्दपार केल्याने परिसरात वातावरण दहशतमुक्त होऊ लागले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी अशी युक्ती केल्यास जिल्हा दहशतमुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.