आकांक्षांची गगनभरारी! स्वप्नांपालिकडचा पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास 14 दिवसांत पूर्ण

धिक्कारुनी मी रूढी परंपरा… घेतला निर्भीड श्वास… स्वैर होऊनी आकाशी… गाठले नवे ध्यास…
एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यावर त्यासाठी लागणारे अथक कष्ट घेतल्यावर ते निश्चितच पूर्ण होते. मी नेहा राजेंद्र भावसार अभिनव कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टिस्ट झाले आहे. नुकतेच मी पुणे ते कन्याकुमारी स्व देखभाल सेल्फ सपोर्टेड सायकल हा 1500 km चा सायकल प्रवास दिनांक 2 जानेवारी ते 17 जानेवारी 2022 असा 14 दिवसांत पूर्ण केला. पुणे ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण फार कमी असून बरोबर कोणतीही मुलगी नसताना मी हे करू शकले याचा मला अभिमान वाटतो.
मे 2021 पासून मी सायकल चालवण्यास सुरुवात केली अवघ्या 9 महिन्यांच्या कालावाधीत सायकलबद्दलच्या आवडीने आज कन्याकुमारी पर्यन्त मजल मारली. सुरुवातीच्या काळात सायकल वरून निसर्ग फिरणे हे खूप आवडू लागले. मग एक जुनी MTB सायकल घेऊन त्यावर पानशेत, कासारसाई, पिकॉक बे अश्या निसर्गरम्य सायकल परिक्रमा केल्या. मला निसर्गाची खूप आवड होती सायकलवरून तो खूपच जवळून बघता यायचा मग मी सायकलवरून फिरू लागले. निर्सगाच्या या आवडीतूनच मग मनाशी पक्का ठरवलं आता जास्तीत जास्त सायकलचा वापर करायचा आणि लोकांनाही सांगायचे. मग स्वतःची नवीन सायकल घेतली आणि घर ते ऑफिस असा रोजचा सायकलचा प्रवास चालू केला मग काय गाडीला रामराम इंधन बचत, पैसे बचत, व्यायाम आणि सगळेच उद्देश यातून साध्य व्ह्यायला लागले. आपण स्वतः प्रदूषणाचा भाग नाही याचा आनंद काही वेगळाच होऊ लागला आणि कोणत्याही क्रांतीची सुरुवात ही आधी स्वतःपासूनच झाली पाहिजे त्यामुळे स्वतःच कमीत कमी गाडीचा वापर करणे चालू केले. सायकलच्या काही रॅली तसेच लोणावळा आणि अत्यंत कठीण असा सिंहगड किल्ला प्रॅक्टिस म्हणून मी जायच्या आधी मी सायकलवर पार केला.
बदलत चाललेले पर्यावरण, निसर्गाचा होणारा ह्रास या सर्व बदलासाठी सायकल हे सर्वोत्तम वाहन असून त्यासाठी वेगवेगळ्या फोटोंच्या मार्फत लोकांपर्यंत ते पोहोचावे यासाठी प्रयत्नशील राहिले.
अत्यंत कठीण, वातावरणातील बदल, डोंगर, घाट, चढाव, कडक उन्ह, आणि निसर्गाचे अप्रतिम सौन्दर्य बघत समुद्रकाठच्या रस्त्यांनी पुणे- सातारा- कोल्हापुर सावंतवाड़ी- मडगांव- कुमटा- भटकल-पय्यानूर- कोझिकोड- गुरुवायुर-कोची-अलेप्पी-वरकला- पूवार आणि कन्याकुमारी अशी पुणे कन्याकुमारी स्व देखभाल सायकल यात्रा मी आणि माझे इतर 3 सहकारी यांनी 14 दिवसात पूर्ण केली.
प्रत्येक ठिकाणांची संस्कृती तिथले आचार विचार, अप्रतिम निसर्गसौदर्य, घाट, कोकण किनारा, गोवा, मडगाव, कुमठा कर्नाटक केरळ चे लोकजीवन आणि खाद्य संस्कृति , केरळ आणि तमिलनाडु चे सूंदर रस्ते, चर्चेस, समुद्र किनारे आणि खान पान , असा समृद्ध अनुभव यातून मिळाला.
2010 मधे पायांच्या अपघातानंतर पायामध्ये कदाचित आपण आता जास्ती चालू शकणार नाही असे वाटत होते. पण या सर्व आव्हानांना मागे सारून मनाच्या शक्तीवर मिळवलेला हा विजय नक्कीच माझ्यासाठी मौल्यवान आहे. तू मुलगी आहेस तू कशाला सायकल चालवायची, तू एवढ्या मुलांमध्ये सायकल चालवते यापलीकडे जाऊन मी किंवा इतर मुलींनी काय कामगिरी केली आहे हे बघितले जाणे गरजेचे आहे. मागच्या माहिलादिनाला मी 400 फूट नागफणी सुळका नऊवारी साडी घालून सर केला होता तसेच कळसुबाई, राजगड, तोरणा यांसारखे ट्रेकही माझ्या खूप आवडीचे. रोटरी क्लबच्या सहकार्याने असलेली पेडल मिशन या सायकल यात्रेचा उद्देश हा जुन्या वापरात नसलेल्या सायकल गोळा करून गरजू व्यक्तींना त्या पुरवण्याचा होता. 15 ऑगस्टला मी 100 किलोमीटर सायकल चालवून कोव्हिड वरियर्सला दिलेली दिलेली सलामीसुद्धा विशेष उल्लेखनीय ठरली. मुलगी म्हणून अनेक ठिकाणी माझा सन्मान झाला आणि लोकांनी माझे स्वागत केले यासाठी आपणां सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद!!
शेवटी एकच सांगावेसे वाटते.
सायकल चालवा आपले बदलत चाललेले पर्यावरण प्रदूषणापासून वाचवा आणि आनंदी निरोगी आयुष्य जगा.







