पुणे । पुण्यात विजेचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू

पुणे । पुण्यातील डेक्कन नदीपात्र परिसरात विजेचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. येथील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना त्यांना शॉक बसला. त्यानंतर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अभिषेक अजय घाणेकर (वय २५), आकाश विनायक माने (वय २१) ,शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, रा . डेक्कन) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही नदीपात्र परिसरातील झेड पुलाखालील अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुण्यात कालपासूनच जोरदार पाऊस आहे. त्यातच गुरुवारी पावसाने चांगलाच वेग धारण केला. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहे.
पहाटे तीन वाजताच्या सुमारास झेड पुलाखालील नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. अंडा भुर्जी गाडीवर काम करणारे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांती डॉक्टरांनी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मयत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत.





