Pune : तीन वर्षाच्या मुलाने गिळले टोकदार चुंबक

पुणे – खेळताना तीन वर्षाच्या मुलाने टोकदार चुंबक गिळल्याने ते छोट्या आतड्यात अडकले. रूबी हाॅल क्लिनकमध्ये एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे हे चुंबक आतड्यातून यशस्वीपणे बाहेर काढले.
एका छोट्या मुलाने खेळताना टोकदार चुंबक गिळल्याने त्याला तीव्र पोटादुखीचा त्रास सुरू झाला. त्याच्या तक्रारीनंतर पालकांनी त्याला रूबी हाॅलमध्ये दाखल केले. आवश्यक तपासणीनंतर चुंबक छोट्या आतड्याच्या मध्यभागी अडकल्याचे आढळले. डाॅक्टरांच्या पथकाने तात्काळ एंडोस्कोपिक प्रक्रिया करून चुंबक छोट्या आतड्यातून (जेजूनम – छोट्या आतड्यातील मध्यभाग) बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
तीन दिवसांपासून मुलाला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्याला रूग्णालयात नेले. त्यावेळी एक छोटी जड वस्तू छोट्या आतड्याच्या मध्यभागी अडकली असून त्याला तीक्ष्ण धातूचे आवरण असल्याचे आढळले. चुंबकामुळे पोट, अन्ननलिका, आतड्याचा सुरूवातीच्या भागासह आतड्याच्या मार्गामध्ये अनेक ठिकाणी पेशींच्या आवरणाला इजा पोहचली होती. त्यामुळे एंडोस्कोपिक प्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवले.
त्यानंतर छातीचा एक्स-रे आणि ओटीपोटाची अल्ट्रासाऊंडद्वारे तपासणी केली आणि शरीरात काही छिद्रे पडलेली नाहीत ना याचे निरीक्षण केल्यावर २४ तासांनी मुलाला हळूहळू द्रवपदार्थ दिले. पुढील तीन दिवसांत मऊ पदार्थ देण्यास सुरुवात केली. आता त्याची प्रकृती चांगली असून, त्याला घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
पालकांनी आपल्या मुलांमध्ये पोटातील दुखणे, मळमळ, उलट्या किंवा ताप यासारखी लक्षणे असतील तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन गॅस्ट्रो इंटेरोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र चोपडे यांनी केले आहे. चुंबक अडकल्याने तेथील स्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती. वस्तूच्या तीक्ष्ण कडांमुळे आणि आतड्यात खोलवर गेल्यामुळे आतील पेशींना नुकसान होण्याचा मोठा धोका होता.
एंडोस्कोपिक प्रक्रिया यशस्वी झाली नसती तर लॅपॅरोटॉमी ही शस्त्रक्रिया करावी लागली असती, यामुळे दीर्घकालीन समस्या, पोटात मोठा व्रण राहिला असता. रुबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रांट, सीईओ डॉ. संतोष शिंदे यांनी डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले.





