Pune : सराफी पेढी लुटणाऱ्या तिघांना अटक; आधी रेकी करूनच टाकला होता दरोडा

पुणे – वडगाव बुद्रुकमधील रेणुकानगरमधील गजानन ज्वेलर्स सराफी पेढी भरदिवसा लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अहिल्यानगर येथे अटक केली. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला नांदेड सिटी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पिस्तूल आणि कोयत्याच्या धाकाने दागिने लुटून हे तिघे फरार झाले होते.
वरदन संजय खरटमल (वय २०), अमर हनुमंत बाभळे (वय २०, दोघेही, रा. वडगाव बु़) आणि ओंकार रवि शिंदे (वय २२, रा मानाजीनगर, नऱ्हे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यातील वरदन, ओंकार रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला काही तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वरील तिघांना ताब्यात घेतले. दागिने लुटण्याचे काम वरदन, अमर आणि विधीसंघर्षीत मुलाने केले. त्यावेळी ओंकार हा तेथे नव्हता. त्यानेच रेकी करून पेढी लुटण्याचे नियोजन केले होते.
सराफ व्यावसायिक मंगल घाडगे (वय ५५, रा. आंबेगाव) यांच्या दुकानात मंगळवारी दुपारी दोन दरोडेखोर शिरले. एक साथीदार बाहेर दुचाकीवर होता. एकाने हातातील कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याला मंगल घाडगे यांनी प्रतिकार केला, तेव्हा दरोडेखोराने त्यांच्या डोक्यात व हातावर कोयत्याने हल्ला केला. दरोडेखोरांनी कपाटाच्या काचा फोडून कपाटामधील ४ लाख ५० हजारांचे दागिने पळवले. दुचाकीवरुन जाताना त्यांनी पिस्तुल व लोखंडी हत्यारे हवेत फिरवत लोकामध्ये दहशत निर्माण केली.





