PUNE: आमदार धंगेकर यांचे ठिय्या आंदोलन; ललित पाटील प्रकरणात कठोर कारवाईची मागणी

पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, तसेच ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागण्या मांडत आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अमली पदार्थ तस्करांवर सरकारने कठोर कारवाई करावी. केंद्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास द्यावा. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी डाॅ. ठाकूर यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करावी. डाॅ. ठाकूर यांना या प्रकरणात अटक करण्यात यावी, असे धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देत होता. शेवतेविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नव्हती, असा आरोपही धंगेकर यांनी केला आहे. शेवतेला अटक करा, अशी मागणी पोलिसांकडे मी केली होती. मी आंदाेलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शेवतेला अटक करण्यात आली. या प्रकरणात कारागृह प्रशासनाची कसून चौकशी करण्यात यावी. ललित पाटील प्रकरणात दोषींची पाठराखण करण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही.
पोलिसांनी योग्य तपास केला असता, तर आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. ललित पाटील ससूनमधून अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याने कोट्यवधी रुपये पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी, डॉक्टरांना दिले आहेत. ललित गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, असे त्यांनी सांगितले.





