पुणे – पालखी सोहळ्यात चोरट्यांनी तीन महिलांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. पालखी सोहळ्यात चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल संच लांबविल्याच्याही अनेक तक्रारीही करण्यात आल्या आहेत. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात महिलेचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत एका महिलेने समर्थ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गुरुवार पेठेत राहायला आहे. महिलेची सून मैत्रिणीसह श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी श्री पालखी विठोबा मंदिरात गेली होती. दुपारी अडीचच्या सुमारास चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीत चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक गाेरड तपास करत आहेत. नाना पेठेतील श्री निवंडुगा विठोबा मंदिर परिसरात श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५२ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पोलीस उपनिरीक्षक साैरभ माने तपास करत आहेत. विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय चौकात पालखीचे दर्शन घेणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रविवारी (३० जून) दुपारी पालखीचे दर्शन घेत होती. त्या वेळी गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत. पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर दुतर्फा गर्दी झाली होती. गर्दीत चोरट्यांनी भाविकांचे मोबाइल संच चोरून नेले. दर्शन घेताना काहींचे मोबाइल संच पडल्याने गहाळ झाले. याबाबत पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी चोरली पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरून नेल्याची घटना माॅडेल काॅलनी परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार बाणेर रस्त्यावरील सकाळनगर येथे राहायला आहेत. गेल्या महिन्यात २२ जून रोजी ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास निघाले होते. दीपबंगला चौक परिसरातील प्रमोद महाले मिनी मार्केटसमोर दुचाकीस्वार चोरट्याने त्यांना अडवले. त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला. ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून चोरट्याने त्यांच्या हातातील ३० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरून नेली. ज्येष्ठ नागरिकाने सोमवारी (१ जुलै) तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.