नेवासा : संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान केले. नेवासा नगरीत पुष्पवृष्टी आणि उत्साहपूर्ण स्वागताने दिंडीचे स्वागत झाले. या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला, ज्यामुळे “माऊली माऊली” च्या गजराने नेवासा दुमदुमली. माऊलींच्या पालखी रथाचे आकर्षण आणि संतांच्या पावन पदस्पर्शाने नेवासा नगरीत भक्तिरस नांदला. वैकुंठवासी गुरुवर्य श्री बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने आणि वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघाली. दिंडीच्या प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत राष्ट्र संत श्री भास्करगिरीजी महाराज आणि पैठणचे संत एकनाथ महाराजांचे वंशज श्री गोसावी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात माऊलींच्या पादुकांचा अभिषेक आणि पूजन झाले. या सोहळ्याला गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक, श्रीराम महाराज झिंजुर्डे, महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज, भगवान महाराज जंगले शास्त्री, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वासमामा गडाख, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरकाका शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर आणि युवा नेते रविराज गडाख उपस्थित होते. नेवासा शहरात दिंडीच्या नगर परिक्रमेदरम्यान चौकाचौकात सडामार्जन, रांगोळ्या आणि पंचारतीने स्वागत झाले. भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांच्या सलामीने दिंडीचा गौरव केला. विविध संस्था-संघटनांनी स्वागत कमानी उभारल्या, तर तरुण मंडळांनी पुष्पवृष्टी केली. पहिला रिंगण सोहळा नेवासा एस.टी. स्टँडच्या प्रांगणात झाला, ज्याने पंचक्रोशीतील भाविकांना आकर्षित केले. रिंगणानंतर दिंडी नेवासा मार्केट कमिटी मार्गे नेवासाफाटा रोडवरील आराध्या मंगल कार्यालयात मुक्कामास गेली. नेवासा खुर्द आणि बुद्रुक ग्रामस्थांनी आमटी-भाकरीची मानाची पंगत दिली. रात्री ह.भ.प. देविदास महाराज राऊत यांची कीर्तन सेवा भक्तिमय वातावरणात झाली. सध्या दिंडीत सुमारे १५ हजार वारकरी सहभागी असून, पंढरपूरच्या मार्गावर आणखी दिंड्या सामील होऊन वारकऱ्यांची संख्या ३० ते ४० हजारांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.