हडपसर – शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन, जय हरी विठ्ठल असा नामघोष अन् ज्ञानोबा माउली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. फुलांची पुष्पवृष्टी आणि ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या गजराने अवघे वातावरण भक्तिमय झाले होते. अखंड ज्ञानोबा-माउली तुकारामांचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज हडपसरमध्ये दाखल झाल्या. सकाळी ८.५५ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे तासभर विसाव्यावर माउलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. त्यानंतर पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सासवड मुक्कामी माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तर दुपारी १२.१५ च्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी गाडीतळ येथे विसाव्यावर दाखल झाली. जय जय रामकृष्णहरीचा निरंतर नामजप, जोडीला टाळमृदंग, त्याच्या तालावर डोलणारी पावले हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्यने गर्दी केली होती. राजकीय नेते मंडळींकडून पालखीचे स्वागत आमदार चेतन तुपे पाटील, आमदार योगेश टिळेकर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर वैशाली बनकर, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रमोद ठोंबरे, संदीप कदम, सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आदींसह परिसरातील माजी नगरसेवक व विविध पक्षांचे, संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.