पुणे – संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे उद्या (शुक्रवारी दि. २०) शहरात आगमन होत आहे. हा सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. यंदा प्रथमच विशेष यंत्रणेद्वारे मुख्य चौकांमध्ये वारकऱ्यांची गणना केली जाईल. दोन्ही पालख्यांचे नेमके लोकेशन कळण्यासाठी विशेष ॲप सुरू करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल केल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. पालखी मार्गावर शहरात विविध चौकात, दोन्ही पालख्यांच्या मुक्काम ठिकाणी, पालख्या मार्गस्थ होताना हडपसर, दिवे घाटात होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. चौकांमध्ये लोखंडी मनोरे उभारून गर्दीवर नियंत्रण ठेवले जाईल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात प्रवेश करताना विश्रांतवाडी चौकात मोठी गर्दी होते. सध्या, तेथे भूमिगत रस्त्याचे काम सुरु असल्याने गर्दी नियंत्रणासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणासाठी जिलेटीनच्या सहाय्याने डोंगर पोखरला आहे. परिणामी, तेथील दरडी सैल झाल्या असून त्यावर चढू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पालखी मार्गातील ६६ कि.मी.चा रस्ता पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा सतर्क आहे. असा असेल बंदोबस्त… पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, २० सहाय्यक पोलीस आयुक्त, १२८ पोलीस निरीक्षक, ५१३ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि ६१४३ पोलीस कर्मचारी वारीवर नजर ठेवतील. त्याचबरोबर राज्य राखीव दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, शीघ्र कृती दल, गृहरक्षक दल आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकेही तैनात केली आहेत. अवजड वाहनांना बंदी… शहराच्या मध्यवस्तीसह इतर भागात गुरुवार (दि.१९) रात्री दहा ते सोमवारी (दि.२३) रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीतील बदल लागू असतील. शहरात प्रवेश होणारे २६ रस्ते व चौकातून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याचे आदेश जारी केले असून दोन्ही पालखी मार्गावरील रस्त्यांना जोडणार्या १२४ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. पालखी मुक्कामी असलेल्या नाना पेठेच्या परिसरात ३८ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तसेच, दोन्ही पालखी प्रस्थान मार्गावरील २३० ठिकाणी वाहतूक बंद केली असून नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. व्हॉट्स ॲप ग्रुपचा वापर… दोन्ही पालखी सोहळ्यातील ७१९ दिंड्यांच्या समन्वयासाठी प्रथमच एक व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून पोलीस वाहतुकीबाबतचे नियमन होणार आहेत. गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन त्यादृष्टीने वाहनचालकांना संदेश पाठवून आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.