Pune : …तर पोलिसी हिसका दाखवला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – सहकारनगर पोलीस स्टेशनमधील तोडफोडी घटनेवरून कायद्याचा धाक राहिला नाही, असं म्हणण्याचा सर्वसामान्य नागरिकांना अधिकार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर जर कोणी हात उचलत असतील, तर अशा समाजकंटक व्यक्तींना पोलिसी हिसका दाखविला जाईल, असे सांगितले.
याशिवाय अशा घटना घडू नये, म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. आरोपी पकडल्यानंतर त्याच्या जवळचे साहित्य काढून घेतले जाईल, तशा सूचना पोलिसांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. विधानभवन येथे माध्यमांशी संवाद साधताना पवार बोलत होते. या वेळी आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, की मला याबद्दल माहिती नाही.
काही लोकप्रतिनिधी चुकीचे वागले, तर सगळ्यांनाच नावं ठेवली जातात. स्वत:ला फार शहाणे समजायला लागलेत, कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही, असे सर्वसामान्य नागरिक बोलतात. त्यामुळे याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी काळजी घेणे गरजेचे आहे. कायद्याचे पालन हे माझ्यासहित सर्वांनी करायला हवे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करता कामा नये, असेही पवार म्हणाले.
आयटीनगरीची कोंडी सोडविणार
हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची मागील रविवारी पाहणी केली होती. त्या वेळी काही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले. कोणती कामे झाली, याचा आढावा आज घेतला. हिंजवडीचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यावर माझा भर आहे. कासारसाई वरून निघणाऱ्या कालव्यावरून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावा घेण्यात आला.
अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. काही रस्ते मोकळे करून घेण्यात येत आहे, तसेच ओढे-नाल्यांवर बांधलेल्या काही इमारती पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिथे किती पाऊस होतो, कोणत्या ओढ्यात किती पाणी येतंय, लांबी-रूंदी किती आहे, याविषयीचा सर्व्हे करायला सांगितले आहे. सर्व कामे वेळेत करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.





