Pune: गंगाधाम चौकातील उतार कमी करणार

बिबवेवाडी – गंगाधाम चौकात झालेल्या अपघातानंतर या ठिकाणी पूल बांधण्यात यावा तसेच उतार कमी करण्यासह इतर सुरक्षिततेचे उपाय करण्यात यावेत, अशी मागणी वालचंद संचेती यांनी केली होती. याची दखल घेत महापालिकेने सदर ठिकाणी तातडीने पाहणी करून येथील उतार कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भातील काम पालिकेच्या पथ विभागाकडून सुरू करण्यात येणार आहे.
गंगाधाम चाैकात अपघातात एक महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका, वाहतूक पोलीस प्रशासनाविरोधात जनआक्रोश उसळला. यानुसार आईमाता मंदीर ते पुना मर्चेंट चेंबरपर्यंत पूल उभारण्यात यावा, अशी चेंबरची अनेक वर्षांची मागणी असल्याचे तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी पालिकेच्या प्रशासकीय कामावर टीका केली होती.
आईमाता मंदीर ते पुना मर्चट चेंबर या रस्त्यावर पूल झाला नाही तर अनेक अपघाती मृत्यु होण्याचा धोका असल्याचे वालचंद संचेती यांनी निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १३) महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्यानुसार सदर रस्त्याचा उतार कमी करण्यासाठी पालिकेने सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गतिरोधक टाकणे, रम्बलर स्ट्रीप्स बसविणे, अतिक्रमणे हटविणे अशी कामेही करण्यात येणार आहेत. टेकडीवरून येणाऱ्या तीव्र उताराचे प्रमाण एकास १२ फूट ऐवजी एकास २० फूट असे केले जाणार आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्त्याची उंची वाढविण्यात येणार आहे तर काही ठिकाणी डोंगराचा उतार कमी करण्याचे काम करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.
प्राथमिक उपाययोजना अशा…
– उतारावर रम्बलर स्ट्रीप्स बसवणार
– उतार सुरू होण्यापूवी गतिरोधक करणार
– सूचनांचे फलक लावण्यात येणार
– अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करणार




