पुणे : शहरात जड वाहनांना बंदी, तसेच वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पाण्याचे टँकर जीवनावश्यक वाहतुकीत मोडत असल्याने त्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही. यामुळे सकाळी ऐन कार्यालयीन व शाळा- महाविद्यालयांच्या वेळेत टँकर चालक बेदरकारपणे वाहन हाकताना दिसतात. शहरात नुकत्याच घडलेल्या दोन घटनांत टँकरचालकांच्या बेपर्वाईमुळे एका तरुणासह महिलेचा मृत्यू झाला आहे. वाघोलीत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू वाघोली भागात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला असून, सहप्रवासी तरुण जखमी झाला. राहुल तुकाराम चौरे (२८, रा. जुनी सांगवी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सहप्रवासी दुर्गेश गवळी (२८, रा. मगरपट्टा, हडपसर) गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार राहुल आणि त्याचा मित्र दुर्गेश शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून जात असताना सातव क्रेन सर्व्हिससमोर भरधाव टँकरने दुचाकीस्वार राहुल आणि दुर्गेश यांना धडक दिली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कचरा वेचक महिलेचा बळी कचरा संकलनासाठी निघालेल्या महिलेचा पाण्याच्या टँकरच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. टँकर चालक २० वर्षांचा असून, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता. राधिका कृष्णा साेनवणे (वय ५२) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अजय ज्ञानेश्वर धोत्रे (२०, रा. सुयोगनगर, वाघोली) यास केली आहे. याप्रकरणी सोनवणे यांचे जावई शरद भाकरे (रा. भवानी पेठ) यांनी वाघोली पोलिसांत फिर्याद दिली आहे. राधिका केसनंद फाटा येथील गोकूळ स्वीट होमसमोर रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असता, पुण्याहून नगरच्या दिशेने निघालेल्या पाण्याच्या टँकरने मागून येऊन त्यांना धडक दिली व त्या टँकर खाली आल्या. त्यांना तातडीने आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. टँकर मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ हजार टँकर रस्त्यावर शहराच्या उपनगरांत आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचे जाळे उभे राहिले आहे. मात्र, त्यांना आवश्यक तसा पाण्याचा पुरवठा होत नाही. यामुळे त्या परिसरांमध्ये दिवस रात्र टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असतो. शहरात किमान चार हजार पाण्याचे टँकर आहेत.