पुणे – सवलतीत कर भरण्यासाठी उरले फक्‍त 10 दिवस

नागरिकांनो, 31 मेपूर्वी कर भरा : महापालिकेचे आवाहन

पुणे – दि.31 मे पूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकरात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. ती मिळविण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी 31 मेपूर्वी कर जमा करावा, असे आवाहन मिळकतकर विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यांत मिळकतकर विभागाने 375 कोटींचा टप्पा गाठल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

जास्तीत जास्त नागरिकांनी शहराच्या विकासासाठी हातभार लावावा, या उद्देशाने 25 हजार रुपयांपर्यंतच्या मिळकतकरावर 5 टक्के, तर त्यापुढील रकमेवर 10 टक्के सवलत महापालिकेकडून दिली जाते. ही सवलत 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीसाठी असते. या कालावधीत कर भरणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होतो. या योजनेची महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली असून नागरिकांना एसएमएसद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास अडीच लाखांहून अधिक दात्यांनी कर जमा करत ही सवलत मिळविली आहे. दरम्यान, ही सवलत आणखी अवघे 10 दिवस असणार असून त्यानंतर कर भरणाऱ्या नागरिकांकडून पालिकेकडून प्रति महिना मिळकतकरावर 2 टक्के दंडाची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी कर वेळेत भरून दंडात्मक कारवाई टाळावी तसेच सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.