मूर्तीवरील ९०० किलो शेंदूर लेप काढला पुणे – ग्रामदैवत श्री कसबा गणपती मूर्तीवरील ९०० किलो शेंदूर लेप काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पाषाणातील मूळ मूर्तीचे दर्शन उद्या, बुधवारपासून घेता येणार आहे. मूर्तीतज्ज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे ही मूळ मूर्ती १५ व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. मंदिराच्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार आदी उपस्थित होते. मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवार(दि. १५ डिसें.) पासून प्रारंभ झाला होता. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर पूर्णपणे बंद ठेवले होते. शेंदूर कवच काढल्यावर मूर्तीचे मूळ स्वरूप समोर आले आहे. मूळ मूर्ती साधारण दोन फूट उंच असून चतुर्भुज आहे. चतुर्भुज पैकी एक डावा हात अभय मुद्रेत, एक उजवा हात आशीर्वाद मुद्रेत दिसून येतो. दुसऱ्या डाव्या हातात मोदक आणि मोदकावर सोंड ठेवलेली दिसते. उजव्या बाजूला खालच्या बाजूस मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीची अर्ध पद्मसनाची बैठक आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत. मूर्तीचे तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि गाभारा बघता येणार आहे. मूळ स्वरूपातील मूर्तीचा पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळा २९ डिसेंबर रोजी झाला. मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार, मधुरा ठकार, विश्वस्त स्वानंद ठकार, साक्षी ठकार यांनी त्याची पुर्नप्राण प्रतिष्ठापना केली. कल्याण कानडे गुरुजी आणि सहकारी यांनी पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने केले. यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच समस्त ठकार वहिवाटदार पुजारी उपस्थित होते. यावेळी सनई वादन, अथर्वशीर्ष पठण, ढोल ताशा वादन, कीर्तन महोत्सवाचे आयजोन केले .