Pune : कोकणातील हापूसचा हंगाम बहरला

पुणे : गोड चवीच्या कोकणातील हापूस आंब्याच्या हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात रविवारी (दि. १३) आवक वाढली आहे. तब्बल सहा ते साडेसहा हजार पेटी आवक झाली. येत्या काही दिवसांत आणखी आवक वाढणार असून, भावातही घट होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
हवामान बदलामुळे यंदा कोकणातील हापूसचे नुकसान झाले आहे. नेहमीच्या तुलनेत केवळ ६० टक्केच पीक आहे. नेहमीच्या तुलनेत हंगाम विलंबाने सुरू झाला आहे. आता हापूसची आवक वाढली आहे. मागील आठवड्यात ३ ते ४ हजार पेटी आवक झालेल्या आंब्याची आता सहा ते साडेसहा हजार पेटी आवक झाली आहे. भावही कमी होत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. ४ ते ८ डझनाच्या पेटीला दर्जानुसार १५०० ते ४५०० रुपये भाव मिळत आहे. तयार १ डझनसाठी दर्जानुसार ४०० ते ८०० रुपये भाव मोजावे लागत आहेत.
कोकणातील हापूसची आवक आता वाढत चालली आहे. त्यामुळे भावात घट होणार आहे. आंबा खाण्याची हीच योग्य वेळ आहे. यंदा हंगामही लवकर संपणार आहे. नेहमी ३० जूनपर्यंत चालणारा हंगाम १५ दिवस आधीच संपण्याचा अंदाज आहे. – युवराज काची, कोकणातील हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड
कोकणातील हापूसची आवक वाढली आहे. येथील बाजारात रविवारी (दि.१३) सुमारे साडेसहा हजार पेटींची आवक झाली. हंगामातील आतापर्यंतची ही उच्चांकी आवक आहे. – बाळासाहेब कोंडे, विभागप्रमुख, फळ, भाजीपाला, पुणे बाजार समिती
२० एप्रिलनंतर वाढणार कर्नाटक हापूसची आवक
कर्नाटक हापूसची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. मात्र, नेहमीच्या तुलनेत ही आवक कमी आहे. रविवारी २ डझनाच्या १० हजार पेट्यांची आवक झाली. तर लाकडी पेट्यांची अवघी ४० ते ५० पेट्याच आवक झाली आहे. २० एप्रिलनंतर आवक वाढेल. सध्या घाऊक बाजारात ३ ते ४ डझनाच्या पेटीला कच्च्या मालाला दर्जानुसार १२०० ते १८०० रुपये, तर पायरीला किलोला १२० ते १५० रुपये भाव मिळत असल्याची माहिती कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.





