Pune : एक लाख मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट

पुणे : शहरातल तीन-चार लाखांहून अधिक मिळकतींची कर आकारणी झालेली नसली, तरी त्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे मिळकतकराचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
पालिकेने आता उत्पन्नवाढीसाठी हात-पाय हलविण्यास सुरुवात केली असून, पुढील आठ महिन्यांत यातील किमान १ लाख मिळकती शोधून त्यांच्यावर कर आकारणी करण्याचे उद्दिष्ट मिळकतकर विभागाच्या २८ विभागीय निरीक्षकांना दिले आहे. गेल्या तीन वर्षांत नवीन मिळकतींच्या कर आकारणीकडे दुर्लक्ष झाल्याने हा निर्णय घेतला आहे.
पालिकेकडून शहरातील निवासी, व्यावसायिक मिळकती, तसेच रिकाम्या जागांवर कर आकारणी केली जाते. एखादी मिळकत बांधून पूर्ण झाल्यावर त्याचे भोगवटा पत्र दिल्यापासून कर आकारणी केली जाते. अनेक जण अनधिकृत बांधकामे करतात. भोगवटा पत्र घेतल्यानंतरही कर आकारणी करून घेत नाही. अशा मिळकती शोधून पालिका कर आकारणी करते. नागरिक स्वत: अर्ज करूनही कर निश्चित करून घेऊ शकतात.
कर निरीक्षकांना आदेश
मिळकतकर विभागास गेल्या वर्षी २३०० कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी आयुक्तांनी अंदाजपत्रकात ३ हजार कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यातच शासनाने पालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या ३२ गावांची कर, तसेच थकबाकी वसुलीस स्थगिती दिली आहे.
परिणामी कर उत्पन्नास मोठा फटका बसणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच कर निरीक्षकांना शहरात सुरू असलेली बांधकामे, वापरातील बदल, कर आकारणीसाठी आलेल्या अर्जावर लक्ष केंद्रित करून १ लाख मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
तीन वर्षांतील मिळकतींचा शोध
वर्ष शोधलेल्या मिळकती
२०२२- २३ ५४ हजार ५७४
२०२३-२४ ५२ हजार ६३३
२०२४-२५ ४० हजार १५३





