पुणे: अडीच वर्षांत पूर्ण होणार नदीकाठ विकसन पहिला टप्पा

स्थायी समितीत आज निविदा सादर होणार
पुणे – भाजपचा महत्त्वकांक्षी प्रकल्प समजला जाणारा नदीकाठ विकसन प्रकल्पाची निविदा मंगळवारी स्थायी समितीत मान्यतेसाठी दाखल केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 265 कोटी रुपयांची ही निविदा असून, संगमवाडी ते बंडगार्डन या काठावर हे काम केले जाणार आहे.
या कामासाठी महापालिकेने सुमारे 363 कोटी 88 लाख रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. पहिलीच निविदा 13 टक्के कमी दराने आली असून, ती स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवली जाणार आहे. दरम्यान, या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच हे काम पुढील 30 महिने (अडीच वर्षे) पूर्ण केले जाणार आहे
ही केली जाणार कामे
प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, नदी सुधारणेसाठी माती खोदाई, मुरूम खोदाई, कठीण खडक खोदाई, ओपन फाउंडेशन, फूटपाथ करणे, सायकल ट्रॅक विकसित करणे, नदी किनारी वृक्षारोपण, अशा वेगवेगळ्या तांत्रिक कामांचा समावेश असून त्यात, दोन्ही बाजूला गॅबियन वॉलही बांधण्यात येणार आहे. +
हे होणार फायदे
* नदीची पूर व वहन क्षमता वाढण्यास मदत होणार
* नदीकाठी असलेला रहिवासी भाग सुरक्षित होणार
* नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होणार
* नदीकाठी होणाऱ्या पब्लिक प्लेसमुळे नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध होणार
* नदीकाठी असलेली उद्याने विकसित होण्यास मदत होणार





