पुणे : पालिकेच्या आर्थिक नाड्या शासनाच्या हाती

अर्थसंकल्पातील जमा आणि खर्च पाहणीसाठी दोन अधिकारी
पुणे : महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी पदी राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी एक पद होते. 2014 मध्ये शासनाने महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत आणखी एका पदाची वाढ केली.
त्यानंतर, या नवीन पदावर शासनाने तुषार दौंडकर यांची नियुक्ती केली होती. मात्र, दौंडकर यांच्या बदलीनंतर 2019 पासून हे पद अद्यापही रिक्त होते. त्यामुळे या दोन्ही पदांचा कारभार महापालिकेच्या मुख्य व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडे आहे. कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान पुणे विद्यापीठ येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता, मुख्य वित्त व लेखा अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
महापालिकेत दोन पदे नियुक्त करताना महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजूसाठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजूसाठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. काही वर्षांपूर्वी यातील जमा बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिलेली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांची बदली होईपर्यंत त्यांच्याकडे लेखा व वित्त विभाग देण्यात आलाच नाही. महापालिकेच्या आर्थिक बाबीत शासनाचा हस्तक्षेप होईल, त्यामुळे दौंडकर यांना पदभार देण्यास अंतर्गत विरोध झाला. दरम्यान, आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे.
वित्त व लेखा विभागासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती
आरोग्य, शिक्षण विभाग वाऱ्यावर
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये आरोग्य सुविधेचा समावेश आहे. ऐच्छिक कर्तव्यांमध्ये प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी महापालिकेकडे आहे. तब्बल 25 लाखांहून अधिक नागरिकांसाठी महापालिकेची आरोग्य सुविधा असून जवळपास एक लाख विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. मात्र, या दोन्ही महत्वाच्या विभागाची प्रमुख पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाचा पदभार प्रभारी म्हणून सहाय्यक आरोग्य प्रमुखांना देण्यात आला असून शिक्षण विभागाच्या प्रमुखपदीही प्रभारी अधिकरी नेमलेले आहेत. त्यामुळे महत्वाच्या विभागांना अधिकारी देण्यास वेळ नसलेल्या शासनाने आर्थिक विभागासाठी मात्र आठवणीने स्वतंत्र अधिकारी नेमला आहे.





