Pune : अंमली पदार्थांचा खेळ संपता संपेना!

पुणे : पुणे पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची होळी केली. नशेखोरांपर्यंत हे अंमली पदार्थ पोहोंचले नाहीत याचे कौतुक असले तरी, तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोघा जणांकडून जवळपास आठ लखांचे अंमली पदार्थ जप्त केल्याने, हे नेशेचे व्यापारी पोलिसांच्या कारवाईंना भीक घालत नसल्याचेच दिसून येत आहे.
पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीची प्रकरणे जवळपास दोन-तीन दिवसाला उघडकीस येत आहेत. गेल्या महिनाभरात चार ते पाच कारवायांमध्ये पोलिसांनी जवळपास दहा ते पंधरा लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
राज्यातून, परराज्यातून पुण्यात हे अंमली पदार्थ विक्रीला येत असताना काही ठिकाणी पोलिसांच्या जाळ्यात सापडतात, मात्र पोलिसांना चकवून शहरात किती माल जातो यासंदर्भात काहीही कल्पना येत नाही. अनेक हॉटेल्स आणि पबमध्ये असे अनेक नशेखोर सापडतात. त्यांना अंमली पदार्थ कुठून मिळतात याचा शोध घेण्याची आता गरज आहे. मुळावर घाव घातल्या शिवाय नशेचा हा बाजार नियंत्रणात येण्याची शक्यता दिसत नाही
६ लखांचे मेफेड्रोन पकडले
मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या अझहर उर्फ बडे सय्यद (रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) या सराईताला फरासखाना पोलिसांनी गणेश पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ८८ हजारांचे २९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले.
गणेश पेठेतील नाडे गल्लीत मंगळवारी (२५ मार्च) मध्यरात्री दोनच्या सुमारास सय्यद मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश राठोड आणि समीर माळवदकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून हे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सय्यद याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच काेणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
येरवडातून १३ किलो गांजा जप्त
येरवडा भागात गांजा विक्री प्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जगदीश भवानसिंग बारेला (वय १८, रा. दहिवत, अंमळनेर, जि. जळगाव), पवन सुभाष बारेला (वय २२, रा. कलकुंटी, जि. बरवानी, मध्य प्रदेश) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. बारेला येरवड्यात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शेळके यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दाेघांना पकडले. त्यांच्याकडून १३ किलो गांजा जप्त करण्यात आला.
फरार आरोपी जाळ्यात
दरम्यान, लष्कर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या नदीम मेमन उर्फ इब्राहिम अल्ताफ कच्छी (वय २५, रा. भागोदयनगर, कोंढवा) याला अमली पदार्थ विरोधी पथकाने काेंढवा परिसरातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, संदीप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी यांनी ही कामगिरी केली.





