मुंढवा – साडेतीन वर्षांच्या मुलीला ताप आल्याने मुलीची आई मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. औषध घेण्यापूर्वीच मुलगी अत्यवस्थ होऊ लागल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णवाहिका तातडीने येणार नसल्याने वेळेचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी स्वत:च्या मोटारीतून मुलीला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने मुलीला जीवदान मिळाले. याबाबत महिती अशी की, घोरपडी येथील मुलगी नर्सरीमध्ये शिकते. दि. १ जुलैला दुपारी शाळेतून आल्यावर तीला ताप आला. मुलीच्या आईने तीला डॉ. विकास पाटील यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून मुलीसाठी औषधे लिहून दिली. दवाखान्याच्या बाहेर मेडिकलमधून औषधे घेईपर्यंत मुलगी अत्यवस्थ होऊन बेशुद्ध पडली. त्यामुळे मुलीच्या आईचा जीव कासावीस झाला. त्यांनी लगेच पुन्हा डॉ. पाटील यांना दाखवले. या स्थितीमध्ये मुलीला तत्काळ अत्यावश्यक उपचार मिळणे गरजेचे होते. नोबल हॉस्पिटमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला. परंतु, रुग्णवाहिका येण्यास उशीरा होणार होता, वेळेत येण्याची शाश्वतीही नव्हती. त्यामुळे डॉक्टर पाटील स्वतःच्या मोटारीतून मुलीला घेऊन निघाले. त्यांची मोटारही वाहतूक कोंडीत अडकली, डॉक्टरांनी बाहेर उतरून अन्य वाहनचालकांना विनंती करीत मोटार गर्दीतून बाहेर काढीत मुलीला नोबल हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल केले. चार दिवसांच्या उपचारानंतर मुलीची प्रकृतीआता सुधारली आहे. मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.