Pune: अमली पदार्थ निर्मिती व तस्करांची साखळी नष्ट करावी – गृहमंत्री फडणवीस

पुणे – अमली पदार्थ समाज आणि तरुणाईला उद्धवस्त करतात. बंदुकीची गोळी, मिसाइल जे काम करू शकत नाही, ते अमली पदार्थ करतात. पूर्वी घरोघरी उसापासून गुळ तयार करण्यात येत होता. तशा पद्धतीने कारखान्यात मेफेड्रॅन तयार केले जाते आहे. त्यामुळे या लढाईत सर्वांनी एकत्रित येऊन अमली पदार्थ निर्मिती व तस्करांची साखळी नष्ट करावी, असे आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवसीस यांनी येथे केले.
पुणे पोलिसांनी आंतराष्ट्रीय ड्रग रॅकेट उद्धवस्त करून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कामाचे कौतूक फडणवीस यांनी केले. यावेळी फडणवीसांनी पुणे पोलिसांना 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याप्रसंगी राज्यसभेच्या निवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे आदी अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई नजीकच्या काळातील देशातील सर्वांत मोठी आहे. हे रॅकेट देश-विदेशात पसरल्याचे दिसून आले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांची बैठक घेऊन, ड्रगमुक्त समाज हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यात आम्ही ड्रगमुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली होती. त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे सर्वांचे डोळे उघडले पाहिजे.
मिळून आलेला अमली पदार्थाचा साठा जर शेवटपर्यंत गेला असता, तर किती जणांची घरे उजाडली असती? अमली पदार्थाच्या काळ्या धंद्यात पैशांची देवान- घेवान मोठ्या प्रमाणात असल्याने लालसेने कारवाई केली जात नाही. त्यामुळे आपल्या समोरील आव्हाने लक्षात घ्या. पोलिसांनी या कारवाईवर थांबता कामा नये. छोटा साठा मिळाला तरी त्यात आनंद न मानता, लिंक शोधून ते ड्रग कोठे तयार होते, ते कशाप्रकारे विक्री होते, त्यात कोण सहभागी आहेत. याचा तपास झाला पाहिजे. तस्करदेखील विविध पद्धती वापरत आहेत. डार्क वेब, सोशल मीडिया तसेच विविध संकेतस्थळांचा वापर केला जातो आहे. ते पोलिसांनी शोधणे गरजेचे आहे.
विठ्ठल साळुंखे यांचा पहिला सत्कार
ड्रग कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे हेड काॅन्स्टेबल विठ्ठल साळुंखे यांचा पहिला सत्कार गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पुरवलेल्या माहितीमुळेच एवढे मोठे रॅकेट उद्धवस्त करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले.





