पुणे…गोळीबारांचीही राजधानी! टोळ्या, गुन्हेगारांसमोर पोलिसांनीही टेकले हात

पुणे – सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर…असा लौकीक असणाऱ्या पुण्याची ओळख आता टोळी, गुन्हेगारांचे शहर होत आहे. नक्कीच ही चांगली बाब नाही. शहरात गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षातील आठ महिन्यांत शहरात १९ गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
२०२३ मध्ये हेच प्रमाण २२ होते. तर २०२२ मध्ये २६ जणांवर गोळीबार झाले. याच काळात शहरात तब्बल ६५ जणांचे खून झाले आहेत. तर ९९ जणांवर खुनी हल्ले झाले आहेत. मागील आठवड्यात शहरात तीन गोळीबार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा….
पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच तुलनेत लोकसंख्यादेखील प्रचंड वाढते आहे. नोकरी आणि व्यवसायाच्याप शोधात शहरात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातूनच आपोआपच गुन्हेगारी देखील वाढीस लागते आहे. त्यातच जुने वाद असलेल्या टोळक्यांकडून आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य केली जातात.
त्यातूनच दोन टोळ्यांच्या संघर्षात नजरेला नजर भिडताच बंदुकीचा बार अन् कोयत्याचा वार काढला जातो आहे. याचे उदाहरण काहीच दिवसांपूर्वी वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणातून दिसून आले. पूर्वीच्या वादातून, तत्कालीक कारण, अनैतिक संबंध, वर्चस्ववाद, प्रेमसंबंध अशा कारणातून खुनाच्या घटना घडल्याची माहिती आहे. मागील वर्षात २०२३ मध्ये शहरात १०२ खुनांच्या तर २३९ खुनाच्या प्रयत्नांच्या घटना घडल्या आहेत.
२०२२ मध्ये हेच प्रमाण १०८ खून तर ३४६ खुनाचे प्रयत्न असे होते. ही सर्व स्थितीमुळे सामान्य पुणेकर मात्र नेहमीच भीतीच्या वातावरणात वावरत असतात. तर, दिवसेंदिवस ढासळत असलेली ही परिस्थिती पाहता, पुणे पोलिसांनीही या गुंडांसमोर हात टेकले आहेत की काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अगदी किरकोळ कारणांवरून…
मद्य प्राशनासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करत नागरिकांना लुटले जाते. तर, मोबाइलचा हॉटस्पॉट दिला नाही म्हणून कोयत्याने डोके तोडले जाते. वडकी परिसरात घडलेल्या या घटनेने पुण्यातील समाजमन अक्षरश: सुन्न झाले आहे. तर, दहशतीसाठी सर्व सामान्यांची वाहने फोडून पिस्तुलातून बार काढला जातो.
या घटना पुण्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहेत. तर दुसरीकडे थेट पोलीस अधिकार्यांवरच कोयत्याने वार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. यावरून यांना कोणाचा धाक आहे की नाही ? असा सवाल उपस्थित होतोय.
“अलीकडच्या काळात तरुणवर्ग झटपट श्रीमंत होण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब करत असल्याचे दिसून येत आहे. ठराविकांकडून केली जाणारी पैशांची उधळपट्टी आणि नैतिकतेचा ऱ्हास यांसारख्या कारणांमुळे कमी कष्टात आणि कमी वेळात खूप पैसा मिळवता यावा, यासाठी तरुणवर्ग गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळत आहे. जवळपास निम्मे गुन्हेगार तरुण वयातील असल्याचे दिसून येत आहे.” – अॅड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील





