Pune Temperature : पुणेकरांनो सावधान! पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर; ‘या’ भागात नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान
Pune Temperature : शिवाजीनगर, पाषाणसह मगरपट्टा परिसरातही उष्णतेचा जोर; उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत.

Pune Temperature – शहरासह उपनगरांत उन्हाच्या वाढत्या झळांनी अंगाची लाहीलाही केली आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाल्यामुळे गुरूवारी (दि. २६) उष्णतेचा पारा ४०च्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. लोहगाव येथे सर्वाधिक ३९.३ तर कोरेगाव पार्क येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुढील काही दिवसांत पारा ४० पार झाल्यास उन्हाचा झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरासह जिल्ह्यातील वाढत्या कमाल तापमानामुळे सलग चौथ्या दिवशी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आठवडाभरात पाच ते सहा अंशाने कमाल तापमानात वाढ झाली आहे तर गेल्या २४ तासांत लोहगाव आणि कोरेगाव परिसरासह पाषाण,
शिवाजीनगर, मगरपट्टा आणि जिल्ह्यातील काही परिसरांत पारा ३७ ते ३८ अंशावर पोहचला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्यातील हवामान कोरडे तर अधून-मधून ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उकाडा वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
प्रमुख ठिकाणांचे कमाल तापमान
लोहगाव ३९.३, कोरेगाव पार्क ३९.२, पाषाण ३८.५, शिवाजीनगर ३८, मगरपट्टा ३७.५, पुरंदर ३७.४, चिंचवड ३७.३, वडगावशेरी ३७.१, हवेली ३७, हडपसर ३६.७, एनडीए ३६.१, शिरूर ३५.१, आंबेगाव ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.





